लाइफस्टाइल ‘स्ट्रेस फ्री’ आहे?
एक अत्यंत सुशिक्षित जोडपे त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. अभिषेक आणि सोनाली (नावे बदलली आहेत.) अभिषेकला सोनालीकडून घटस्फोट हवा होता. कारण काय, तर काहीच नाही. फक्त त्याला कायदेशीर बंधन नको होते. तो सोनालीचा मित्र म्हणून तिची सर्व जबाबदारी घेण्यास तयार होता; पण नवरा म्हणून त्याला बंधनमुक्त व्हायचे होते. सोनालीची इच्छा काय, तर तिला घटस्फोट नको होता. सोनालीचा आणि मुलाचा अभिषेकवर खूप जीव होता. पण, तरीही त्याला हे सर्व नको होतं. असं का? तर त्याचं एका M.R. मुलीवर प्रेम होतं. तीही घटस्फोटित होती. तिला ५०-६० हजार पगार होता. मुलं मोठी होती. अशातच अभिषेकही M.B.A. झालेला. चांगला जॉब. ७०-८० हजार पगार. सतत बाहेर राहणे, खाणे-पिणे हेच त्याचे रूटीन होऊन गेले होते. Luxurious लाइफस्टाइल, आर्थिक स्वातंत्र्य आणि बेफिकीर वृत्तीने अभिषेकला वेढलेलं होतं. अशातच त्याला हे सर्व खूप Prestigous वाटत होतं. पण, तो आपली सांसारिक जबाबदारी पूर्णपणे विसरला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याचे म्हणणे होते, मला जशी मैत्रीण आहे, तसाच सोनालीलाही मित्र असावा. त्यांच्या Relationship ला माझी काहीच हरकत नाही. हा विचार म्हणजे अभिषेक स्वत:चा मोठेपणा, मोकळेपणा आणि आधुनिक दृष्टिकोन समजत होता. अर्थातच सोनालीचा त्याला नकार होता. वास्तविक पाहता हा शुद्ध मूर्खपणाच होता. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील पुसटशी रेषा प्रत्येकाने ओळखायलाच हवी.
अशा परिस्थितीत सोनाली अत्यंत तणावाखाली होती. त्यांच्या मुलाला तर यातलं काहीच समजत नव्हतं. चांगली बायको, पैसा, छोटसं कुटुंब असं सर्व काही असताना अभिषेकला अशी दुर्बुद्धी का सुचावी? याला उत्तर एकच, आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्यातून बिघडलेली जीवनशैली आणि त्यातून आलेले ताणतणाव.
आजकालच्या धकाधकीच्या आणि चंगळवादाच्या युगात सर्वांचीच सांसारिक आणि व्यावसायिक पातळीवर घसरण होताना दिसते. याचं कारण म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. खेड्यापाड्यांतून जमिनींच्या भावाच्या रुपाने, नोकरी-व्यवसायातून येणारा अमाप पैसा, याचा परिणाम म्हणूनच की काय, समाजाची मानसिकता प्रचंड वेगाने बदलत चालली आहे. या सगळ्यांत केवळ पुरुष किंवा स्त्रिया जबाबदार नसून एकंदरीत समाजाची मानसिकता, ताणतणाव आणि जीवनशैली या गोष्टी जबाबदार आहेत. यात कौटुंबिक दारिद्र्य, बेकारी, माता-पित्यांमध्ये सततचे वादविवाद, व्यसनाचे आकर्षण, कुसंगत, घरातील कडक किंवा दुर्लक्षित वातावरण, अश्लील चित्रपट, साहित्य, चुकीचे आदर्श आणि संस्कार व मार्गदर्शनाचा अभाव असे अनेक प्रवाह आहेत. यापैकी कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकामुळे विकृतीचा जन्म होतो. आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्यामधून अत्यंत चुकीचे मार्ग निवडले जातात. मग हे सगळं असंच घडत जाणार का? की आम्हाला त्याचं काय देणं-घेणं आहे? समाज नुसताच बघ्याची भूमिका घेणार का? पण आपली भूमिका ठरविताना आपण एकच लक्षात ठेवायला हवं की, असा अप्रिय प्रसंग आपल्या घरातील किंवा परिचितातील एखाद्या व्यक्तीवरही येऊ शकतो.
या सगळ्यावर बोलायचं म्हणजे केवळ हे लिहाणाच पुरेसे नाही. तर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे ही सध्याची गरज बनली आहे. आपली लाइफस्टाइल Stress free आहे काय? नसेल तर त्याची कारणे काय, त्यावर उपाय काय, याबरोबरच आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षिततेची भावना देण्यासाठी आपल्या परीने काय करता येईल, याचा विचार करून त्याप्रमाणे कृती केली पाहिजे.

